याचा धर्म, त्याचा धर्म !!
जन्माला आल्यावर नाही,
पण प्रत्येकाच्या कपाळावर लिहलेला एक रंग,
कोणाचा हिरवा, कोणाचा भगवा,
कोणाचा निळा, तर कोणाचा नुसताच पांढरा. -१-
भगव्याचा प्रश्नावर,
निळा बाजूला पडतो.
हिरव्या बरोबरच्या भांडणात
तो भगव्यांत मिसळून जातो.
हिरवे आपला रंग,
एरवी सगळ्या रंगात मिसळतात,
पण निवडणुकीत मात्र,
त्यांना अल्पसंख्यांकात मोडतात.
पांढरे आयुष्यातही
पांढऱ्या सारखेच जगतात
सगळ्यांशी तोलून मापून मिसळून
'केम छो??' म्हणत आपलं वेगळेपण जपतात.
जन्माला आल्यावर नाही,
पण प्रत्येकाच्या कपाळावर लिहलेला एक रंग,
कोणाचा हिरवा, कोणाचा भगवा,
कोणाचा निळा, तर कोणाचा नुसताच पांढरा. -२-
चार भगवे एकत्र आले की
कपाळावर टिका लाऊन आपले भगवेपण जपतात.
चार हिरवे एकत्र आले की
हिरवे पताके उभारून, आपली हद्द आखतात.
निळे कायमच वेगळे असतात
निवडणुकीत ते मात्र सर्वाना जवळचे होतात
तेव्हा ज्याची पोळी खातात त्याची टाळी वाजवतात
नंतर परत ते सगळ्यांनाच आगळे होतात
पांढरे सगळ्यात राहून
आपलं वेगळच जग तयार करतात, वाढवतात
चार पैसे कनवटीला बांधून, गोड बोलून
बाकी रंगाना त्यांच्या जगातून बाहेर ढकलतात
जन्माला आल्यावर नाही,
पण प्रत्येकाच्या कपाळावर लिहलेला एक रंग,
कोणाचा हिरवा, कोणाचा भगवा,
कोणाचा निळा, तर कोणाचा नुसताच पांढरा. -३-
देश्यावर संकट आल्यावर
सगळे रंग एकमेकांत मिसळतात
एरवी मात्र
आपापसातच शत्रुत्व राखतात
भगवा, आपल्या सैन्याच्या पराक्रमाचा
सफेद, गांधीजींच्या शांतीप्रिय देशाचा
हिरवा, आपल्या शेतकऱ्यांचा हिरवळीचा
निळा, या सार्वभौम राष्ट्राचा
जसे निसर्गात एकवटलेले सगळे रंग
तसे तिरंग्यात एकातएक गुंफलेले रंग
प्रत्येकाच्या सणात हवेत उधळलेले रंग
निवडणुकीत मात्र वेगवेगळे होत जातात रंग
कारण, जन्माला आल्यावर नाही,
पण प्रत्येकाच्या कपाळावर लिहलेला एक रंग,
कोणाचा हिरवा, कोणाचा भगवा,
कोणाचा निळा, तर कोणाचा नुसताच पांढरा. -४-
- अतुल
No comments:
Post a Comment